
पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दुचाकी दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू
पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ऐतिहासिक प्रतापगड परिसरातील एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गुरुवारी (23 एप्रिल) संध्याकाळी बाइकवरून प्रवास करणारे दाम्पत्य तब्बल 900 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.हे दाम्पत्य वाई बावधन नाका परिसरातील रहिवासी होती. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तब्बल 8 तासांनंतर सापडला मृतदेह
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य गुरुवारी संध्याकाळी आपल्या बाइकवरून प्रतापगडकडे निघाले होते. घाटमार्गातील एका वळणावर अचानक बाइकचा ताबा सुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे बाइक संरक्षक कठड्याला धडकून आणि थेट सुमारे 900 फूट खोल दरीत जाऊन कोसळल्याचे म्हटलं जातंय. या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेकर्सना खाली बाइक पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ दरीत उतरून शोध घेतला असता, हा भीषण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पण रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.रात्रीच्या अंधारात मृतदेह बाहेर काढणे अत्यंत जोखमीचे असल्याने रात्री उशीरा बचावकार्य थांबवण्यात आले होते. तब्बल आठ तासानंतर महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.




