
शिरगाव क्र.१ शाळेसमोरील रस्त्यावर गतीरोधकच नाही !
खेड : – तालुक्यातील व सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिरगाव गावची स्थापना होऊन जवळपास १०० वर्षे झालीत. विलासनगर शाळेला जवळपास ९६ वर्षे झाली. पण राज्यशासनाने अथवा कोणत्याच शासकीय यंत्रणेने या मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवलेले नाहीत याचे आश्चर्य वाटते. याची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हितार्थ शिरगाव गावच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत , अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील शिरगाव गाव हे राज्याची विधानसभा गाजविणारे आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदारसंघ संघात येते. गेली ९६ वर्षे शिरगावात जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे. याचे साधे भानही त्यांना नाही. बांधकाम विभाग खेड यांनीही दखल घेतलेली नाही. कारण त्यांना शिरगाव हे ग्रामीण विभागात येते. आणि गावाचा विकास काय असतो, हे माहीतही नाही! यावर गावचे सुशिक्षित नागरिक हैराण आहेत. ग्रामपंचायतीने तर कळसच केला आहे. गेली १२ वर्षे सरपंच हे अशिक्षित आहेत. ७ वर्षे यांचे तर ५ वर्षे त्यांचे. सुशिक्षित फक्त ग्रामसेवक असतो आणि तो ही ११ वर्षे. कोणतेही गावचे कामाचे बील असो ग्रामसेवक बनवतोच. सही देणारे सरपंच अशिक्षित असतात, त्यांना वाचताच येतं नाही. त्यामुळे गावाचा विकास हा गेली ५० वर्षे खुंटला आहे. याबाबत शाळेसमोरील दुकानदार शिवाजीराव भोसले यांनी मोठी खंत व्यक्त केली असून, त्यांचे म्हणणे आहे की, कुळवंडी खासगी शाळेला दोन गतिरोधक, मिर्ले जिल्हा परिषद शाळेला मुख्य रस्त्यावर दोन गतीरोधक, खोपी छत्रपती शिवाजी कॉलेजला दोन गतिरोधक मग त्यापुढे शिरगाव गावाच्या जिल्हा परिषद शाळेस मुख्य शाळेच्या रस्त्यावर गतिरोधक का नाहीत हे गणित माझ्या आकलनापलीकडे आहे. ही जिल्हा परिषद सातवी पर्यंतची शाळा महाराष्ट्र शासनाच्या पटलावर आहे की नाही? आमदार, खासदार, पंचायत सदस्य उत्तर देतील का? हा गंभीर प्रश्न आहे. विशेष म्हणजे ८ किमी. चा हा मुख्य डांबरी रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून पूर्ण करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने जवळपास ४ कोटी रुपये खर्च केलेत. तरी शिरगाव गावातील जि. प. शाळा क्रमांक १ समोरील रस्त्यावर गतीरोधक बसविण्यात यावेत. अशी मागणी .शिरगाववासिय ग्रामस्थांनी केली आहे.




