
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून २००वे मरणोत्तर देहदान
भंडारा, दि. २० : साकोली तालुक्यातील शिरेगावटोला येथील खुशाल धोंडुजी पुराम (वय ७६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी मरणोत्तर देहदान करत समाजापुढे आदर्श ठेवला. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून साकारलेले हे २००वे देहदान ठरले आहे.
कै. पुराम यांचे पार्थिव नागपूर येथील एन. के. पी. साळवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल येथे सुपूर्द करण्यात आले. या देहदानाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीर रचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी होणार आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून अवयवदान व देहदानाबाबत समाजात जागृती निर्माण झाली असून आजपर्यंत १५६ अवयवदानांमध्ये १३३ नेत्रदान व २३ त्वचादान पार पडले आहेत. “माणसाने मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे” या संकल्पनेला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी इच्छापूर्ती अर्ज नोंदवले आहेत.
पार्थिव सुपूर्द करताना कै. पुराम यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यामध्ये मुलगा आनंदराव खुशाल पुराम,चोपराम खुशाल पुराम, जावई रामकृष्ण येळणे, तसेच इतर नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शिरेगावटोला येथील सरपंच रोहित संग्रामे, पोलिस पाटील देवचंद वाढवे, तंटामुक्ती अध्यक्ष शिशुपाल लंजे यांच्यासह गावकऱ्यांनी सहकार्य केले.
तसेच रामानंद संप्रदायातर्फे
अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजोपयोगी कार्याची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला असून देहदान चळवळीला यामुळे अधिक बळ मिळत आहे.




