
उमेदच्या साथीने पुनसची भारतीय ब्रँडची भरारीउद्योजिका सदफ हुनेरकर यांची प्रेरणादायी यशोगाथा
*ग्रामीण भागातील महिला केवळ चूल आणि मूल यात न अडकता, योग्य अर्थसहाय्य आणि प्रशिक्षणाच्या जोरावर जागतिक बाजारपेठेत आपले अस्तित्व निर्माण करू शकतात, याचे उत्तम उदाहरण लांजा तालुक्यातील पुनस गावच्या सदफ फाईक हुनेरकर यांनी जगासमोर ठेवले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या 'वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर' (OSF) प्रकल्पाच्या मदतीने त्यांनी भारतीय हा ब्रँड 'BHARTIYA – Who Leads The World' या टॅगलाईनसह यशस्वीपणे उभा केला आहे.यशाचा श्रीगणेशा: २०१५ पासूनचा प्रवास
सदफ हुनेरकर या २०१५ मध्ये पुनस गावातील ‘माशाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समुहा’त सामील झाल्या. २०१७ ते २०२२ या काळात त्यांनी जिल्हा आणि राज्य स्तरावरील अनेक ‘सरस’ प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. मे २०१९ मध्ये खारघर येथील राज्यस्तरीय प्रदर्शनात त्यांनी केवळ १० दिवसांत २ लाख रुपयांच्या हापूस आंब्यांची विक्रमी विक्री केली होती. त्यांच्या या विक्री कौशल्याची दखल घेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते.
शाश्वत उपजीविकेच्या शोधात असताना सदफ यांनी ‘उमेद’ अभियानातील ‘मिलाप’ (MILAP) कार्यशाळेत ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण घेतले. स्वतः प्रगती करत असतानाच गावात ७५ महिलांचे ५ उत्पादक गट तयार करून त्या ‘उद्योग सखी’ म्हणूनही काम करत आहेत.
आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारच्या OSF प्रकल्पांतर्गत १.५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य घेतले. काटकसर आणि नियोजनाचा आदर्श घालत त्यांनी अवघ्या ३० हजार रुपयांत स्वतः दुकानाचे रंगकाम व फर्निचर करून व्यापारी गाळा सजवला. उरलेल्या १.२० लाख रुपयांतून मुंबईतून होलसेल दरात कपड्यांची खरेदी करून १ जानेवारी २०२३ रोजी नव्या दालनाचा शुभारंभ केला.
‘भारतीय’ ब्रँड आणि जागतिक स्वप्न
केवळ दुकान न चालवता भविष्यात गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उतरण्याचे सदफ यांचे स्वप्न आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या व्यवसायासाठी ‘भारतीय’ हे नाव आणि ‘Who Leads The World’ ही टॅगलाईन निश्चित केली आहे. या ब्रँडचा लोगो सध्या ट्रेडमार्कसाठी पाठवण्यात आला असून, भविष्यात समूहातील महिलांचा माल जागतिक बाजारपेठेपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे.
आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मिती
गेल्या ८ महिन्यांत त्यांच्या दुकानातून १ लाख २५ हजार रुपयांची विक्री झाली असून, त्यातून त्यांनी २० ते ३० टक्के निव्वळ नफा मिळवला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्याच समूहातील एका महिलेला कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
“एकेकाळी घराच्या उंबरठ्यात असणाऱ्या मला ‘उमेद’ अभियानामुळे नवी ओळख मिळाली. आता मला केवळ स्थानिक बाजारपेठच नाही, तर जगाच्या सीमा खुणावत आहेत.”असे सदफ फाईक हुनेरकर अभिमानाने सांगतात.
हा यशस्वी प्रवास अन्य महिलांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरणारा आहे.
– अमृता भातडे-धुंदूर
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी




