
रत्नागिरीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात
“विचारांच्या एकतेतूनच परिवर्तन” : संदेश जगताप. प्रथमच मध्यरात्री पोलिसांकडून डॉ बाबासाहेबांना मानवंदना



रत्नागिरी/ प्रतिनिधी
आधुनिक भारताचे निर्माते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रत्नागिरी शासकीय रुग्णालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे मंगळवारी १४ एप्रिल रोजी सकाळपासूनच जयंती महोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता थिबा राजाकालीन बुद्ध मूर्तीस्थळी वंदना सूत्रपठन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुढे धम्म ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सिव्हिल परिसरातील पुतळ्यापासून जयस्तंभ, आठवडा बाजार येथून पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला धम्म रथ उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. कलात्मक सजावट आणि संदेशप्रधान मांडणीमुळे हा रथ रॅलीतील उठून दिसणारा भाग ठरला. रथाच्या अग्रभागी भव्य, दिव्य आणि सुंदर अशा बुद्ध विहाराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. सूक्ष्म तपशीलांसह उभारलेली ही प्रतिमा बौद्ध संस्कृतीची झलक देणारी ठरली आणि पाहणाऱ्यांच्या मनावर ठसा उमटवून गेली. या प्रतिकृतीच्या मागील बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसह त्यांचे स्वाभिमान आणि स्वावलंबन अधोरेखित करणारे विचार दर्शविणारा बॅनर झळकत होता. “स्वकष्टाने बुद्ध विहार उभारण्याचा” संदेश देणारे हे विचार उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे ठरले. रथासमोरून जाणारा प्रत्येक बौद्धबांधव थांबून या देखाव्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते. विशेषतः तरुणाईत या धम्म रथाबद्दल मोठे आकर्षण दिसून आले.
भव्य रॅलीमध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भीम आर्मी आदी संघटनांचे कार्यकर्ते लहानग्यांपासून वयोवृद्धापर्यंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या कार्यक्रमांना जवळपास पाच हजारांहून अधिक बौद्ध बांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. सकाळपासून सुरू झालेल्या विविध उपक्रमांना बौद्ध बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून आले. उपस्थितांच्या संख्येमुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, कार्यक्रम संपेपर्यंत बहुसंख्य उपस्थितांनी आपापली जागा सोडली नाही. शेवटपर्यंत लक्षपूर्वक कार्यक्रम ऐकण्याची आणि सहभागी होण्याची बांधवांची भूमिका लक्षवेधी ठरली.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते संदेश सोपान जगताप (बहुजन विचार प्रचारक) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आंबेडकरी चळवळीतील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. संघटना वेगवेगळ्या असल्या तरी विचार एकच आहे. बाबासाहेबांच्या नावाने समाज नेहमीच अन्यायाविरुद्ध एकत्र उभा राहिला आहे, असे ते म्हणाले.
जगताप यांनी पुढे सांगितले की, समाजाला मिळालेले शिक्षण, नोकरी, समानता व न्याय हे बाबासाहेबांच्या संघर्षातूनच प्राप्त झाले आहेत. “जातव्यवस्था ही देशाच्या प्रगतीस अडथळा असून तिचे निर्मूलन करण्यासाठी संविधान हा मार्ग आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश कृतीत उतरविण्याचे आवाहन त्यांनी केले.
राजकीय सक्षमीकरणाची गरज अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, खरा बदल विधिमंडळातून घडतो. त्यामुळे समाजाने आपले प्रतिनिधित्व बळकट करणे आवश्यक आहे. तसेच सर्व वंचित घटकांनी एकत्र येऊन सामाजिक न्यायासाठी लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत सावंत तर स्वागताध्यक्ष शिवराम कदम होते. यावेळी एल. व्ही. पवार, तुषार जाधव, किशोर पवार, दीपक जाधव, अमोल जाधव, दिवेन कांबळे, रुपेश कांबळे, नरेंद्र अहिरे, सुनील अंबुलकर, सुनील पवार, राजन जाधव, मुकुंद कांबळे, प्रदीप पवार, प्रकाश यशवंत पवार, राजेश सावंत, राजेंद्र कांबळे, राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कडेकोट पोलिस बंदोबस्तात जयंती उत्सव पार
दोन दिवस चाललेल्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी प्रशासनाकडून भक्कम पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना अभिवादनासाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. एकूण ८ अधिकारी, सुमारे १२० पोलिस कर्मचारी तसेच RCP तुकडी तैनात करण्यात आली होती. या बंदोबस्तामुळे कार्यक्रम सुरळीत आणि शांततेत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रत्नागिरीत प्रथमच मध्यरात्री पोलिसांकडून डॉ बाबासाहेबांना मानवंदना
जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रत्नागिरीत प्रथमच मध्यरात्री पोलिस दलाकडून विशेष मानवंदना देण्यात आली. नितीन बगाटे यांनी स्वतः उपस्थित राहून बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बँड पथकाच्या सुरावटीत मानवंदना देण्यात आली, ज्यामुळे वातावरणात भावपूर्ण आणि अभिमानाची अनुभूती निर्माण झाली. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी माइनणकर तसेच पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांची उपस्थिती होती. मुंबईतील चैत्यभूमीप्रमाणेच रत्नागिरीतही अशा पद्धतीने मानवंदना देण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
समता सैनिक दलाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभा संलग्न समता सैनिक दलाच्या वतीने अभिमानपूर्वक मानवंदना देण्यात आली. शिस्तबद्ध संचलन आणि सुसंगत पद्धतीने दिलेल्या सलामीमुळे कार्यक्रमात विशेष भारदस्तपणा जाणवला. समता सैनिक दलाच्या जवानांनी एकसंधतेचे दर्शन घडवत बाबासाहेबांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला. त्यांच्या या मानवंदनेतून आंबेडकरी चळवळीतील शिस्त, संघटनशक्ती आणि निष्ठा अधोरेखित झाली.




