महिलांच्या सतर्कतेमुळे गार्डनचे गेट चोरण्याचा डाव उधळला


रत्नागिरी शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील एका पडीक गार्डनचे लोखंडी गेट दुचाकीवरून चोरून नेण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केला. मात्र, परिसरातील जागरूक नागरिक सौ. सिद्धी शिरगावकर यांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा डाव उधळला गेला.

घटनेनुसार, सौ. सिद्धी शिरगावकर यांनी गेट घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना पाहताच तत्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी परिसरातील इतर महिलाही मदतीसाठी पुढे आल्या. त्यांच्या सतर्कतेमुळे व तत्परतेमुळे सार्वजनिक मालमत्तेची चोरी होण्यापासून बचाव झाला.

या घटनेची माहिती सौ. लावगणकर यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देसाई यांना दिली. माहिती मिळताच प्रवीण देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मा. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

यावेळी प्रवीण देसाई यांनी सौ. सिद्धी शिरगावकर तसेच मदतीसाठी पुढे आलेल्या इतर महिलांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत सांगितले की, “सार्वजनिक मालमत्ता ही समाजाची सामूहिक संपत्ती असून तिचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सौ. सिद्धी शिरगावकर आणि इतर महिलांनी सामाजिक भान राखत दाखविलेली जागरूकता व धाडस निश्चितच कौतुकास्पद असून इतर नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे.”

परिसरातील नागरिकांनीही महिलांच्या या सतर्कतेचे स्वागत करत सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच गार्डन परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button