
रत्नागिरी जवळील आरे वारे समुद्रात बुडून डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी जवळील आरे वारे समुद्रात बुडून डोंबिवलीतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
डोंबिवली येथील हा तरुण आपल्या मित्रांसह रत्नागिरीतील आरे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आला असता, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहासोबत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.निशांत राजेश ठाकरे (वय २४ वर्षे, रा. डोंबिवली वेस्ट, जि. ठाणे) या तरुणाचे नाव आहे
ही घटना ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडली. निशांत ठाकरे हा त्याचा मित्र अंकितकुमार राकेशकुमार सिंह व इतर मित्रांसोबत आरे बीचवर पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना निशांत हा पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे समुद्रात ओढला गेला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मिळून आला नाही. या घटनेची माहिती मिळाल्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७:१५ वाजता काळबादेवी-फडजीवाडी येथील मारुती मंदिर जवळील समुद्र किनाऱ्यावर एक मृतदेह स्थानिकांना आढळून आला. पोलीस पाटील आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निशांतचे वडील आणि नातेवाईक यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेने रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) आणण्यात आला जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.



