
आता मासेमारी बंदी कालावधी १ जून ते १५ ऑगस्ट असा करण्यात आला,अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या मागणीला यश
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्यातील मासेमारी बंदी कालावधीत १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी राज्यातील मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै असा असून तो एकूण ६१ दिवसांचा होता. नव्या निर्णयानुसार या कालावधीत १५ दिवसांची वाढ करण्यात आल्याने आता मासेमारी बंदी कालावधी १ जून ते १५ ऑगस्ट असा करण्यात आला असून, तो एकूण ७६ दिवसांचा असेल.
मासेमारी बंदी कालावधीत वाढ झाल्यामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेस अधिक वेळ मिळणार असून समुद्री जैवसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होईल. यामुळे भविष्यात मच्छिमारांना अधिक प्रमाणात मासेमारी उपलब्ध होऊन त्याचा सकारात्मक परिणाम मत्स्यव्यवसायावर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या मागणीसाठी राज्यातील विविध मच्छिमार सहकारी संस्था, संघटना तसेच मच्छिमार प्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून माननीय मंत्री महोदय यांना निवेदने सादर केली आणि ही मागणी शासन दरबारी ठामपणे मांडली. तसेच राज्यातील तमाम पत्रकार बंधूंनी या विषयाला व्यापक प्रसिद्धी देऊन मच्छिमारांच्या मागणीला योग्य प्रकारे वाचा फोडली.
याबद्दल संपूर्ण मच्छिमार समाजातर्फे माननीय मंत्री महोदय तसेच सर्व पत्रकार बंधूंचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.




