
ब्रेक फेल झाल्याने रत्नागिरी रेल्वे स्टेशन उतारावर ट्रक कलंडला; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून शहराच्या दिशेने येणाऱ्या तीव्र उतारावरील रस्त्यावर आज ब्रेक फेल झाल्याने एका ट्रकचा अपघात झाला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला वळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावरून शहराकडे येत असताना ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्या वेळी समोरून आणि पुढे अनेक वाहने असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, समोरच्या वाहनांना धडक बसू नये आणि नागरिकांचे प्राण वाचावेत, या उद्देशाने चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रक रस्त्याच्या कडेला वळवला. यामुळे ट्रक रस्त्यालगत कलंडला. चालकाच्या या धाडसी निर्णयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. ट्रक हटविण्याचे काम सुरू असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. चालकाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याने त्याच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




