
मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा व महा वॉकेथॉन यशस्वी करा- जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. १३ ):- राज्यात खालावलेली भूजल पातळी आणि पाणी टचांईवर मात करण्यासाठी माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताहानिमित्ताने मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा व महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन करा. स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सागर पाटील, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक संदेश कडव, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण विभाग धनंजय सहुत्रे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक सचिन सनगरे, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. अंकुश शिरसाट आदी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत १५ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मृद व जलसंवर्धन रिल्स (Reel for Soil and water Conservation) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. Save Soil, Save Water, Secure Tommorrow ही थीम असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोगट १५ ते ३० वर्षे आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदाची इंस्टाग्राम रील तयार करावी. व्हिडीओ रिलच्या सुरुवातीला उद्देश, स्वत:चे संपूर्ण नाव व जिल्ह्याचे नाव नमूद करावे. रिल स्वत:च्या पब्लिक इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करावी. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करणे आवश्यक आहे.
अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरणे अनिवार्य आहे. क्यूआर कोड स्कॅन करुन नोंदणी करावी. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये, तृतीय पुरस्कार १० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रिल स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले.
महावॉकेथॉन Walk for Water २१ ऑगस्ट रोजी महावॉकेथॉन Walk for Water चे आयोजन करण्यात आले आहे. वॉकेथॉनचे अंतर कमाल ३ किलोमीटर असून १५ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती क्यूआर कोडद्वारे नोंदणी करुन सहभागी होवू शकतात. वॉकेथॉनमधील प्रथम ५ विजेत्यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार असून सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना यांनी या महावॉकेथॉनमध्ये सहभाग घ्यावा.




