जुना पूल तोडल्याने गावांचा संपर्क तुटला

पर्यायी रस्त्याअभावी नागरिक हैराण

खेड : तालुक्यातील फुरूस पोयनार मार्गावरील सुमारे ८० ते ८५ वर्षांपूर्वी बांधलेला जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच तोडला असून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. सध्या दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या कामामुळे फलसोंडा परिसर आणि पोयनार गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या केवळ पायवाट स्वरूपात एक तात्पुरता मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु या मार्गावरून रिक्षा किंवा चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी, ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी पायीच प्रवास करावा लागत आहे. याचा त्रास विशेष करून शाळकरी मुलांना सहन करावा लागत असून, वाहतुकीअभावी दररोज पायपीट करावी लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांची सोय नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
या ठिकाणी वाहतुकीसाठी त्वरित पर्यायी रस्त्याचे काम सुरू करून किमान रिक्षा व लहान वाहनांसाठी योग्य मार्ग उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली असून, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विकासकामे आवश्यक असली तरी त्याचबरोबर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे परिसरातील नागरिक शहाबुद्दीन सईद परकार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button