
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हिंदी पंधरवडा

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने हिंदी पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या विविध लेखांच्या भित्तिपत्रकाचे अनावरण प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी आस्था बाळगून हिंदी भाषेतील साहित्याचे अवांतर वाचन केले पाहिजे, समाजात हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार केला पाहिजे तसेच हिंदी विभागातील पीएच.डी. संशोधन केंद्रातून विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यानिमित्त हिंदी निबंध, काव्य वाचन व पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र आणि पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे उपस्थित होते. हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी हिंदी पंधरवडा साजरा करण्यामागील पार्श्वभूमी, आयोजित उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.
हिंदी निबंध स्पर्धेत सानिया शेख, वैष्णवी पेडणेकर, आयुश पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. प्रेरणा कांबळे, मिताली मांडवकर, मधुरा पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. परीक्षक म्हणून डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. कृष्णात खांडेकर आणि प्रा. गौरी बोटके यांनी काम पाहिले. हिंदी काव्य वाचन स्पर्धेत अंजली चौहान, दीप्ती झगडे व सेजल मेस्त्री यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवयित्री सुनेत्रा जोशी व डॉ. शाहू मधाळे यांनी काम पाहिले.
हिंदी पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम वर्षासाठी सबिहान्ज खान आणि ग्रुप, अनुष्का लोकरे आणि ग्रुप, रुक्सार काझी आणि ग्रुप यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तृतीय वर्षासाठी सानिका पवार, अंजली चौहान, कुणाल शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. परीक्षक म्हणून प्रा. सचिन सनगरे व डॉ. सीमा वीर यांनी काम पाहिले.
हिंदी रोजगार और नवाचार यावर व्याख्यान
यानिमित्त हिंदी विभाग आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी रोजगार और नवाचार या विषयावरील व्याख्यान डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय (दिल्ली विश्वविद्यालय, दिल्ली) येथील डॉ. अनिल कांबळे यांनी ऑनलाइन माध्यमातून दिले. त्यांनी हिंदी भाषा, तिचा उद्गम आणि विकास, समकाळातील हिंदी भाषेचे महत्त्व, हिंदी भाषेतील रोजगाराच्या विविध संधी अशा विविध पैलुंवर प्रकाश टाकला. भारतापुरत्या सीमित असलेल्या हिंदी भाषेने जागतिकीकरणाच्या काळात आपल्या सीमा ओलांडल्या आहे. विदेशातील अनेक विद्यापीठात हिंदी भाषेचे अध्ययन –अध्यापन होऊ लागले आहे, असे सांगितले.




