
जिल्ह्यातील किनारपट्टीला संरक्षणाचे कवच
कोकण किनारपट्टीवर सातत्याने वाढत असलेल्या समुद्री धूपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत ’कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पां’ तर्गत २५ जिल्ह्यातील तब्बल संवेदनशील ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे उभारण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे किनारपट्टीवरील गावे, शेती आणि पायाभूत सुविधा सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पहिल्या टप्प्यात आरे आणि नेवरे या किनार्यांवर बंधारे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.
आरे येथील ८२५ मीटर लांबीच्या बंधार्यासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्या ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर नेवरे येथील ५२५ मीटर लांबीच्या बंधार्यासाठी ५ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या ठिकाणी ९० टक्केकाम पूर्णत्वास आले आहे. या बंधार्यांच्या उभारणीसाठी आधुनिक ’जिओ फॅब्रिक बॅग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. समुद्रातील लो टाईडच्या भागातून वाळू काढून ती विशेष बॅगमध्ये भरून बंधार्याची निर्मिती केली जाते. या बॅग्स दीर्घकाळ टिकणार्या असून पारंपरिक टेट्रापॉडच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित २३ ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये गणेशगुळे येथे ७.९२ कोटी रुपयांचा १.१७२ मीटर लांबीचा बंधारा, भाट्ये येथे ६.३३ कोटींचा ८८४ मीटर बंधारा आणि गावखडी येथे ७.०९ कोटी रुपयांचे संरक्षक काम प्रस्तावित आहे. तसेच वेळणेश्वर (वेंगणी) येथे ५.५३ कोटी, पूर्णगड येथे २.९३ कोटी रुपांचा निधी मंजूर करण्यात आला आहे विशेष म्हणजे गणपतीपुळे या अतिसंवेदनशील किनार्यासाठी ३० लाख रुपयांच्या जिओ बॅग्स बंधार्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.
दापोली तालुक्यातील किनारी भागातही या योजनेचा मोठा विस्तार करण्यात आला आहे. आडे, कर्दे (भाग १ व २), कोळथरे, लाडघर, मुरुड, हर्णे, बुरोंडी, पाजपंढरी, पाडले, साळुंद्रे आणि करंजगाव आदी गावांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीतून धूप प्रतिबंधक बंधारे उभारले जाणार आहेत.
www.konkantoday.com




