
“लेकीच्या भविष्यासाठी आलोय”, देसाईगंजच्या आशीष बनकर यांचा जंतर-मंतरवर भावनिक हुंदका!
CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील रहिवासी तथा कार सजावटीचा (कार मॉडिफिकेशन) व्यवसाय करणारे आशिष बनकर यांनी व्यक्त केलेली व्यथा अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली.
तब्बल २४ तास आणि सुमारे १,२०० किलोमीटरचा प्रवास करून पत्नी व तीन वर्षांच्या चिमुकलीसह आंदोलनस्थळी पोहोचलेल्या बनकर यांनी विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत, “माझ्या लेकीच्या भविष्यासाठी मी इथे आलो आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
देसाईगंज येथे कार सजावटीचा व्यवसाय करणारे आशिष बनकर यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे आणि पोलिस कारवाईचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पाहिल्यानंतर आपण अस्वस्थ झाल्याचे सांगितले. घरात स्वस्थ बसून हे सर्व पाहणे शक्य नव्हते. विद्यार्थ्यांवर जे घडत आहे, त्यानंतर मला आणि माझ्या कुटुंबालाही रात्रभर झोप लागेना. त्यामुळे पत्नी आणि मुलीला घेऊन थेट दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
आंदोलनस्थळी तीन वर्षांच्या मुलीला छातीशी कवटाळून बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. माझ्या लेकीच्या भविष्यासाठी मी २५ हजार रुपयांची बचत केली होती. मात्र विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय पाहून तीच रक्कम दिल्लीला येण्यासाठी खर्च केली. मी नियमित कर भरतो, प्रामाणिकपणे व्यवसाय करतो, पण आज या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी इथे उभा आहे. माझा व्यवसाय, घर आणि सर्व कामे मागे सोडून आलो, कारण माझ्या मुलीसह देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य सुरक्षित असावे, अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत संताप व्यक्त करत त्यांनी सरकार आणि प्रशासनालाही सवाल केला. एका व्यक्तीच्या राजीनाम्यासाठी इतक्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, भविष्य आणि जीव धोक्यात घालणे योग्य आहे का, सामान्य नागरिकांनी आणखी किती काळ अन्याय सहन करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथून केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत पोहोचलेल्या आशिष बनकर यांच्या भूमिकेची आंदोलनस्थळी सर्वत्र चर्चा रंगली असून, त्यांच्या भावनिक आवाहनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.




