
प्रवाशांनी पाठ फिरवली,मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा अवघ्या काही दिवसांतच ठप्प
गाजावाजा करुन सुरु झालेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा काही दिवसातच ठप्प झाली आहे मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर अवघ्या काही तासांत कापण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोकणवासीयांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखाचा व्हावा या उद्देशाने १ मार्च रोजी सुरू करण्यात आलेली रो-रो बोट सेवा अवघ्या वीस दिवसांतच बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.या रो-रो सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन प्रवासी ६ ते ७ तासांत इच्छित स्थळी पोहोचत होते. मात्र, सेवेचा वेग जेवढा सुसाट होता, तेवढेच तिचे तिकीट दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. या बोटीतील प्रवासासाठी आकारले जाणारे दर आणि तिथे मिळणाऱ्या जेवणाचे अवाच्या सवा किमती, यामुळे सर्वसामान्य कोकणवासीयांनी या सेवेकडे पाठ फिरवली.माजी आमदार परशुराम उपरकर यांनी या गोंधळावर नेमके बोट ठेवताना म्हटले की, कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते, ज्याचा इथे पूर्णपणे अभाव दिसला. मुंबईहून विजयदुर्गला पोहोचल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या पुढच्या गावांत जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती.विजयदुर्ग बंदरावर उतरल्यावर प्रवाशांची होणारी ही फरफट आणि बोटीतील तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांची संख्या घटत गेली. अखेर १९ मार्च रोजी ही सेवा अधिकृतपणे बंद करण्यात आली. त्यातच देवगड परिसरात या बोटीला झालेला किरकोळ अपघात आणि सतत उद्भवणारे तांत्रिक बिघाड यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव सेवा स्थगित केल्याचे सांगितले असले तरी, महागडे दर आणि गैरसोयींमुळे झालेली प्रवाशांची पाठ फिरवणी हेच या बंदीमागचे मुख्य कारण मानले जात आहे. एकूणच रो रोव सेवेला ब्रके लागला आहे.




