दिवसाढवळ्या साखळी चोरीचा थरार; पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची साखळी चोरून पलायन
रत्नागिरी शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धाडसी चोरीची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हिंदू कॉलनी परिसरात भरवस्तीत दोन अज्ञात चोरट्यांनी एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचन जैन हे आपल्या घराजवळ उभे असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्याजवळ येत पत्ता विचारण्याचा बहाणा केला. जैन पत्ता सांगण्यासाठी पुढे सरसावताच मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी झडप घालून हिसकावली. काही क्षणांतच दोन्ही चोरटे दुचाकीवरून वेगाने पसार झाले.
पीडिताने दिलेल्या वर्णनानुसार आरोपी सडपातळ बांध्याचे तरुण असून त्यापैकी एकाने तोंडावर रुमाल बांधला होता, तर दुसरा उंच होता. दोघेही मराठीत संवाद साधत होते. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
भरवस्तीत आणि सकाळच्या वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.




