रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल ७० अत्याधुनिक ’रोव्हर’ मशीन उपलब्ध करून दिल्याने आता जिल्ह्यात जमीन मोजणी सुपरफास्ट


रत्नागिरी जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाकडे जमीन मोजणीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणार्‍या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल ७० अत्याधुनिक ’रोव्हर’ मशीन उपलब्ध करून दिल्या असून, मोजणीच्या शुल्कातही कपात करण्यात आली आहे. यामुळे आता मोजणी प्रक्रिया जलद, अचूक आणि पारदर्शक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या यंत्रणेमुळे आणि कंत्राटी भूमापकांच्या नियुक्तीमुळे अर्जदारांना मोजणीसाठी जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या उंबरठ्यांवर खेटे घालण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पूर्वी अपुर्‍या मनुष्यबळामुळे आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जमीन मोजणीची प्रक्रिया संथ होती. पैसे भरूनही नागरिकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता प्रत्येक भूमापकाकडे स्वतंत्र ’रोव्हर’ मशीन देण्यात येणार असून, या सुमारे १२ लाख रुपये किंमतीच्या उपकरणाद्वारे प्रणालीच्या साहाय्याने अक्षांश-रेखांशासह अचूक मोजणी करता येणार आहे.
राज्य शासनाने मोजणी प्रक्रियेत मुसूत्रता आणण्यासाठी ’साधी’ आणि जलद’ अशा दोनच पद्धती ठेवत नवीन दर जाहीर केले आहेत. ग्रामीण भागासाठी प्रति हेक्टरी ४,००० रुपये, तर शहरी भागात चौरस मीटरसाठी २,००० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भारही कमी होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button