
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात यशस्वी; वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक पाटील
रत्नागिरी:
लोटे परशुराम एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (LOIL) या प्रकल्पाबाबत कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली असून, हा प्रकल्प सर्व पर्यावरणीय, सुरक्षा आणि नियामक नियमांचे काटेकोरपणे पालन करत असल्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब केले.
यावेळी माहिती देताना कंपनीचे उत्पादन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक पाटील म्हणाले की, लोटे येथील प्रकल्प स्थापनेपासूनच सर्व आवश्यक वैधानिक परवानग्या घेऊन कार्यरत आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी किंवा प्रक्रिया उत्सर्जन हे कोणत्याही प्रकारे पर्यावरणास हानी पोहोचवत नाही. प्रकल्पात अत्याधुनिक ‘क्लोज्ड-लूप’ प्रणालीचा वापर केला जातो, ज्यामुळे हानिकारक घटक बाहेर पडण्याची शक्यता उरत नाही. तसेच, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उच्च क्षमतेची संयंत्रे कार्यान्वित असून, प्रक्रिया केलेले पाणी आणि धोकादायक कचरा हा केवळ राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त केंद्रांकडेच विल्हेवाटीसाठी पाठवला जातो.
कंपनीने आपल्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, येथील सर्व प्रक्रिया डिजिटल ट्रेसेबिलिटी प्रणालीद्वारे नियंत्रित केल्या जातात. यामुळे कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता येते. प्रकल्पातील फ्लोअरिंगपासून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सर्वच ठिकाणी उच्च दर्जाची मानके राखली गेली आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पात तयार होणारी फ्ल्युरिनयुक्त आणि नॉन-फ्ल्युरिनयुक्त उत्पादने ही सध्याच्या आधुनिक जगासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. सेमीकंडक्टर, संरक्षण क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहने, वैद्यकीय उपकरणे आणि औषधनिर्मिती अशा महत्त्वपूर्ण उद्योगांना लागणारा कच्चा माल या प्रकल्पातून पुरवला जातो.
जागतिक स्तरावर फ्ल्युरिन रसायनशास्त्राचा वापर अत्यंत कडक नियमावलीत केला जातो आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक देखील त्याच जागतिक मानकांचे पालन करत आहे. पर्यावरणाचे रक्षण करतानाच देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणे, हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियामक संस्था आणि स्थानिक हितधारकांशी सतत संवाद साधून पारदर्शकता जपण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला कंपनीचे उत्पादन विभागाचे अध्यक्ष राजेश नाईक आणि पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय वैशंपायन हे देखील उपस्थित होते. कंपनीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे लोटे येथील प्रकल्पाच्या पर्यावरणीय सुरक्षेबाबत असलेली अधिकृत स्थिती समोर आली आहे.




