रत्नागिरीत भगवान महावीर जन्मकल्याण उत्सव उत्साहात साजरा

रत्नागिरी : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणाचा उत्सव शहरात भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्वेतांबर जैन मूर्तीपूजक संघातर्फे जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.

सत्य, अहिंसा अपरिग्रह आणि आत्मसंचय या तत्वांचा प्रसार करणाऱ्या भगवान महावीर यांचा यंदा २६२५ वा जन्मकल्याण महोत्सव आहे. यानिमित्त सकाळी जैन मंदिरात अभिषेक, पूजन व प्रवचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान महावीरांच्या अहिंसा, सत्य आणि अपरिग्रह या तत्त्वांचे स्मरण केले. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मंदिरातून शोभायात्रा सुरू झाली. राम आळी, राधाकृष्ण नाका, धनजी नाका मार्गे मारुती आळी मार्गे परत जैन मंदिरात शोभायात्रा आणण्यात आली. या शोभायात्रेत आकर्षक रथ, धार्मिक देखावे आणि घोषवाक्यांमधून महावीरांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.

लहान मुलांनी व युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी समाजातील मान्यवरांनी महावीरांच्या शिकवणी आजच्या काळात अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले. अहिंसा आणि सहिष्णुतेचा संदेश समाजात रुजवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

उत्सवानिमित्त अन्नदान व सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. एकूणच, भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवाने रत्नागिरीत धार्मिक उत्साहासोबत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button