
चांदीचे दर वाढताच रत्नागिरीत चोरट्यांचा चांदीवर डल्लामारुती मंदिर परिसरातील ज्वेलरचे दुकान फोडत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्सचे शटर उचकटत दुकानांतील सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या चांदीवर डल्ला मारला. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डीव्हीआरही चोरून नेला आहे.
, सुमित्रा ज्वेलर्सचे मालक किशोर महादेव देवरूखकर (वय ६३, रा. राजेंद्रनगर) यांनी शनिवारी (२८ मार्च) रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले होते. रविवारची सुट्टी असल्याने दुकान बंदच होते. सोमवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास जेव्हा ते दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी कोणत्या तरी कठीण हत्याराच्या साहाय्याने शटर उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी दुकानातील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. यामध्ये सुमारे १ लाख रुपये किंमतीचे (१०५० ग्रॅम) चांदीचे पैंजण, ५० हजार रुपये किंमतीचे (३१० ग्रॅम) चांदीचे ताम्हण, २० हजार रुपये किंमतीचे (२०० ग्रॅम) चांदीचे छल्ले या सामानाचा समावेश आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ५ हजार रुपये किंमतीचा हिकव्हीजन कंपनीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवून नेला आहे.
चोरटे अत्यंत सराईत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. आपली ओळख पटू नये आणि चोरीचा कोणताही पुरावा मागे राहू नये, या हेतूने चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज रेकॉर्ड होणारा डीव्हीआर सोबत नेला आहे.
याप्रकरणी किशोर देवरूखकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे हे करीत आहेत.




