
कोकणातही आता निसर्ग बदलतोय
कोकणातलं हवामान कधीकाळी दिनक्रमासारखं असायचं. पावसाळा ठरलेल्या वेळेत यायचा, रिमझिम पाऊस पडायचा. जमिनीला, झाडांना, माणसांना सगळ्यांना त्याची सवय होती. उन्हाळा उकाड्याचा असला तरी समुद्राच्या वार्यामुळे सहन व्हायचा. थंडी हलकीशी पण सुखद असायची. ऋतू बदलायचे, पण धक्का द्यायचे नाहीत. मात्र आता चित्र वेगळं आहे. कोकणातील निसर्ग बदलतोय आणि तो आपल्याला त्याची जाणीव करून देतोय.
कोकणात पाऊस नुसता पडत नाही. तर तो धडकतो. पूर्वी कोकणात सरासरी २८०० ते ३५०० मिमी इतका पाऊस पडत असे तर मिनी महाबळेश्वर दापोलीच्या भागात तो ४ हजार मिमी पर्यंत पोहोचायचा. मात्र हा पाऊस साधारण ८० ते ९० दिवसांमध्ये पसरलेला असायचा. आता परिस्थिती बदलली आहे. पावसाचे दिवस घटून काही ठिकाणी ६०-७० दिवसांवर आले आहेत. पण एका दिवसात पडणार्या पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, कोकणात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये गेल्या काही दशकांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कधी अचानक ढगफुटी तर कधी दीर्घ कोरडे दिवस. अशी टोकाची स्थिती निर्माण होते. यामुळे शेतीचं गणितच बिघडून गेलंय.www.konkantoday.com




