
“कोमसाप” नाट्य विभागाच्या समितीवर मिनार पाटील यांची निवड
रत्नागिरी : मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकामध्ये पार पडलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मिनार पाटील यांचा ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचे रौप्यपदक मिळाल्याबद्दल कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी येथे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक सुसज्ज ‘मिनी थियेटर’ उभारण्यात आलेले आहे. या मिनी थिएटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते झालेल्या सत्कारानंतर मिनार पाटील यांचा हा दुसरा भव्य सत्कार मालगुंड येथे झाला.
रत्नागिरीतील समर्थ रंगभूमी संस्थेने सादर केलेल्या आणि प्र. ल. मयेकर लिखित ‘अग्निपंख’ या नाटकातील दमदार अभिनयासाठी रत्नागिरीचा सुपुत्र तथा कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांचा सुपुत्र, अभिनेता मिनार पाटील याला राज्यस्तरीय उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक (रौप्यपदक) प्राप्त झाले आहे. जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून या नाटकाने राज्य स्तरावर धडक मारली होती, जिथे राज्यभरातील तब्बल ४७ संघांशी त्यांची मोठी चुरस होती.
दिग्दर्शक ओंकार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या नाटकात मिनारने आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडत परीक्षकांची मने जिंकली आहेत. मिनार पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रात आणि मराठी मालिका तसेच चित्रपटात मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच महाराष्ट्रातील अग्रगण्य साहित्यिक संस्था “कोमसाप”च्या माध्यमातून मिनारचे झालेले कौतुक म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. इतक्या मोठ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत एका कोकणपुत्राने अभिनयाचा प्रथम क्रमांक पटकावणे ही जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे. हे कौतुक करताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या समवेत कोमसाप अध्यक्षा नमिता किर , कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वस्त एल. बी. पाटील यांच्यासह साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



