सीजेपीचा १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा; मुंबईतील आंदोलनानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची घोषणा!


मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) घेतला आहे. येत्या १० ऑक्टोबरला नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठे आंदोलन करण्याची घोषणा पक्षाचे संस्थापक आणि संयोजक अभिजीत दिपके यांनी केली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे शुक्रवारी झालेल्या आंदोलनानंतर ही घोषणा करण्यात आली.

मतदार याद्यांमधील अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने सर्व वयोगटातील आणि स्तरातील नागरिक उपस्थित होते, असा दावा आयोजकांनी केला. पोलिसांकडून निर्बंध असतानाही शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात आले.

मुख्य निवडणूक आयुक्ता ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास देशभरातील आंदोलनकर्ते १० ऑक्टोबरला दिल्लीत दाखल होऊन जंतरमंतर येथे आंदोलन करतील, असा इशारा दिपके यांनी दिला. मुंबईनंतर गोवा, हैदराबाद, कोलकाता, पटणा, बेंगळूरु, रांची अशा देशाच्या विविध भागात सीजेपीचे आंदोलन होणार आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्यास ज्या ठिकाणी अडविले जाईल, तेथेच आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे आंदोलन शांततामय पद्धतीने करण्यात येणार असून महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनाच्या मार्गाने आंदोलन करण्याचा दावा आयोजकांनी केला आहे. लोकशाही संस्थांवरील नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे दिपके यांनी सांगितले.

दरम्यान, २० जुलै रोजी झालेल्या कारवाईचा संदर्भ देत पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशाराही आयोजकांनी दिला आहे. ”ही लोकशाही वाचविण्याची लढाई असून, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांवर विश्वास असलेल्या प्रत्येक नागरिकाने १० ऑक्टोबरच्या आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन दिपके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button