
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे उष्माघात कक्ष सुरू
मालगुंड : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे विशेष उष्माघात (Heat Stroke) कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत उष्माघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
उष्माघात कक्षामध्ये थंड पाणी, ORS द्रावण, आवश्यक औषधे तसेच रुग्णांना आरामदायी वातावरण देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, रुग्णांची त्वरित तपासणी व उपचार केले जात आहेत.
आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, दुपारी १२ ते ४ या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे आणि हलका आहार घेणे यासारख्या उपाययोजना कराव्यात.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास (उच्च तापमान, डोके गरगरणे, उलट्या, अशक्तपणा) त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




