’लक्ष्मी ऑरगॅनिक’चा टँकर ’सीईटीपी’ बाहेर नागरिकांनी पकडला


लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी लिमिटेड ऑरगॅनिक केमिकल कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी नाट्यमय वळण मिळाले. कंपनीतून ’एक थेंबही बाहेर जात नाही’ असा दावा प्रशासन आणि संबंधितांकडून केला जात असतानाच कंपनीच्या गेटमधून बाहेर पडलेला भरलेला टँकर आंदोलकांनी पाठलाग करून सीईटीपीबाहेर पकडल्याने खळबळ उडाली. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून सीईटीपी प्रशासनाने टँकर आतमध्ये न घेता तो परत कंपनीकडे पाठवला.
लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीमार्फत घातक पिफासचे उत्पादन घेत असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात असून ही कंपनी बंद करावी या मागणीसाठी गेले कित्येक दिवस कोकण नागरी संघर्ष समितीमार्फत कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. चिपळूण व खेड तालुक्यातील लोटे परिसरातील धामणदेवी, आंबहस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी, चिरणी, घाणेखुंट, सोनगाव, कालुरते बुद्रुक आणि शेल्डी अशा एकूण अकरा ग्रामपंचायतींनी कंपनीविरोधात ठराव केल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. कंपनी बंद होईपर्यंत हा लढा सुरुच राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button