
भोंदू ज्योतिषी अशोक खरातचे महाराष्ट्राबाहेरही राजकीय भक्त, रुपाली चाकणकर राजीनामा देणार का ?
नाशिक : अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरातकडे आपले राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमधील उच्चपदस्थांचा समावेश आहे.
त्यामुळेच हिंमत वाढलेल्या खरातने कोट्यवधींची माया जमविण्यासह अनेक अनुचित प्रकार केल्याचे उघड होऊ लागले आहे. खरातच्या कार्यालयातून पोलिसांना सापडलेल्या ५८ चित्रफितींमध्ये राजकीय मंडळींसह विविध क्षेत्रातील नामांकित महिलांचीही माहिती असल्याने गोपनीयता बाळगली जात आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची वाढती व्याप्ती पाहता राज्य शासनाने चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला असल्याने स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथील अशोक खरातविरुध्द एका महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यावर त्याचे बिंग फुटले. धार्मिकतेच्या आड लपलेला त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष असलेल्या खरातने अंकशास्त्राची जाण आणि राजकीय वर्तुळातील वावर या जोरावर अनेकांवर अत्याचार केल्याचे, धमकी देत लुबाडल्याचे उघड होऊ लागले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
अंकगणिताच्या आधारे भविष्य सांगण्यास सुरुवात केल्यानंतर हळूहळू खरातची महती काही पोलीस अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत पोहचली. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजही त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येऊ लागले. त्याच्या मंदिरात दर्शन घेऊ लागले. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही त्याच्या मंदिरात येऊन गेले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या तर खरातच्या श्री शिवनिका संस्थानमध्ये विश्वस्तच आहेत. चाकणकर या खरातची पाद्यपूजा करताना, त्याच्यावर छत्री धरतांना अशी अनेक छायाचित्रे समाज माध्यमात आली आहेत.
भोंदू खरातचे परराज्यातही अनेक भक्त असून खरातचे लागेबांधे अनेक उच्चपदस्थांशी असल्याचे सांगितले जाते. केंद्रासह राज्यातील काही मंत्री, हरियाणा, राजस्थानसह इतर राज्यातील मंत्री, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे काही नेते खरातचे पाईक असल्याचे सांगितले जाते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे -पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबरोबरचे खरातचे छायाचित्रे समाज माध्यमात आल्याने हे नेतेही खरातच्या आहारी गेले होते की काय, अशी चर्चा सुरु आहे. कारण, खरातच्या मंदिरात एकनाथ शिंदे येऊन गेल्यानंतरच तो अधिक प्रसिध्दीत आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या तर शिवनिका संस्थानमध्ये विश्वस्तच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
तीन गुन्हे दाखल
अशोक खरात याच्यावर महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी खरात याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसची तपासणी केली असता एक पिस्तूल, काही संशयास्पद कागदपत्रे, काडतुसे सापडले आहेत. खरातविरुध्द सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात अश्लील चित्रफित समाज माध्यमात टाकण्याची धमकी आणि पाच कोटींची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरुन तसेच शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील छायाचित्र समाज माध्यमात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री दोन आठवड्यांपासून नजर ठेवून ?
भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती उघड होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यापूर्वीच या प्रकरणात कारवाई करण्याच्या दृष्टीने लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने खरातविरुध्द कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. आधी पुरावे हाती आल्यानंतर लगेचच पोलिसांनी खरातविरुध्द कारवाई केली. या प्रकरणात महत्त्वाच्या चित्रफिती आणि काही माहिती आधीच पोलिसांनी ताब्यात घेतली होती, अशी चर्चा आहे.




