
चिपळुणात उभारणार ’गॅसिफिकेशन’ प्रकल्प
चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. त्यामुळे दररोज ५ टन कचर्याची विल्हेवाट लागणार आहे. यासाठी सुमारे ५ कोटी रुपये लागणार असल्याने येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक निधी द्यावा, असे साकडे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना घातले आहे. त्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नगराध्यक्ष सकपाळ यांनी शहर स्वच्छतेला अधिक महत्व दिले असून घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम केले जाणार आहे. त्यामुळे दररोज ५ टन कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी तितक्या क्षमतेचा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेकडून तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी दरपत्रक मागवण्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या मुदतीत प्राप्त झालेल्या तीन दरपत्रकांपैकी सर्वांत कमी दरानुसार ४ कोटी ९९ लाख ५५ हजार ३५७ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात अनेक सुविधा उपलब्ध करायच्या असून १६ इलेक्ट्रिक कचरा वाहन खरेदी केली जाणार आहेत. त्यामुळे यासाठी लागणारा निधी द्यावा अशी मागणी नगराध्यक्ष सकपाळ यांनी कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी सकपाळ यांनी शहराचा वाढता विस्तार, कचर्याची निर्माण होणारी समस्या, घनकचरा प्रक्रिया केंद्रावर सुक्या कचर्याचे वाढणारे मोठे प्रमाण, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चिपळूण शहर विकासासाठी आम्ही पाठीशी आहोत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
www.konkantoday.com




