
भोस्ते घाटात नाटकाच्या गाडीचा अपघात; दोघे जखमी
खेड : ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा गोव्यातील प्रयोग आटपून संपूर्ण टीम मुंबईच्या दिशेने परतत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात (१७ मार्च) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास गाडीला अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, घाट उतरताना अचानक बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात गाडीतील दोघांना दुखापत झाल्याने त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा गोव्यातील प्रयोग आटपून संपूर्ण टीम मुंबईच्या दिशेने परतत होती. यावेळी भोस्ते घाट उतरत असताना त्यांच्या बसने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना रिक्षामधून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात नाटकाचे साउंड आर्टिस्ट विलास दाते आणि बस चालक प्रकाश आव्हाड हे जखमी झाले आहेत. विलास दाते यांच्या डोक्याला मार लागून त्यांना तीन टाके घालावे लागले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच साहित्यप्रेमी उत्तम जैन यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली तसेच त्यांना आवश्यक ते सहकार्य केले. दरम्यान, अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे २५ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.




