
कोतळूक ग्रामदेवतेच्या सहाणेवर १५ रोजी भजनाची डबलबारी
गुहागर तालुक्यातील कोतळूक येथे ग्रामदेवतेच्या सहाणेवर देवीच्या पालख्यांचे आगमन होणार असून त्यानिमित्ताने भजनाची डबलबारी व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
१५ मार्च रोजी कोतळूक ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजाई देवीच्या पालख्यांचे आगमन होणार आहे त्यानिमित्त रात्री ९.४५ वा. ग्रामदेवतेच्या सहाणेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवा श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड बुवा विजय परब यांचे शिष्य संदीप लोके बुवा, पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरूद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ कर्दे कुडाळ गुरूवर्य बुवा अशोक सावंत यांचे शिष्य विजय (गुंडू) सावंत बुवा पखवाज विराज बावकर, तबला संकेत गोसावी यांच्यात भजनाची डबलबारी कार्यक्रम भजन प्रेमींच्या मार्फत आयोजित करण्यात आला आहे.
१६ मार्च रोजी रात्री ९ वाजता शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, तर १८ मार्च रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा व त्या दिवशी रात्री १० वाजता हौशी नमन मंडळ गोळवली यांचे बहुरंगी नमन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




