
लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांतील स्फोटांची स्वतंत्र चौकशी करा; कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीची मागणी!
रत्नागिरी : लोटे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार होणाऱ्या स्फोटांच्या घटनांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने केली आहे. शुक्रवारी डॉ. खान केमिकल्स या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेबाबत कंपनीकडून स्पष्ट माहिती देण्यात येत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
लोटे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपन्यांमधील अपघात स्थानिकांसाठी नवीन नसल्याचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी नमूद केले. २०२१ नंतर या परिसरात अनेक गंभीर अपघात घडले आहेत. घरडा केमिकल्समध्ये झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुष्कर केमिकल्स, सुप्रिया केमिकल्स, विनती ऑर्गॅनिक आणि डिव्हाईन केमिकल्समध्येही स्फोट किंवा आग लागण्याच्या घटना घडल्या असून अनेक कामगार जखमी झाले किंवा मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे डॉ. खान केमिकल्समधील स्फोट दुर्दैवी असला तरी तो नवीन प्रकार नाही, असे दलवाई यांनी म्हटले आहे.
डॉ. खान केमिकल्समध्ये इथेनॉल या कच्च्या मालाचा वापर करून एथिल सिलिकेट आणि प्री-हायड्रोलाइज्ड एथिल सिलिकेट ही रसायने तयार केली जातात. या प्रक्रियेत निर्माण होणारा अल्कोहोल-आधारित कचरा अत्यंत धोकादायक असून तो तळोजा येथील इन्सिनरेटरमध्ये नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित कंपनी हा कचरा स्थानिक विक्रेत्यांमार्फत अनियमित पद्धतीने नष्ट करत असल्याचा आरोप दलवाई यांनी केला.
लोटे एमआयडीसी परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची गंभीर स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. फॅक्टरी इन्स्पेक्टरचे कार्यालय कोल्हापूर येथे असल्याने अपघातानंतर अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचतात. गॅस गळतीसारख्या गंभीर घटनांनंतरही प्रशासन वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच पीफास हे अत्यंत घातक रसायन तयार करणारी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद करण्यासाठी कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीमार्फत लढा सुरू असल्याचे दलवाई यांनी सांगितले. पीफास या रसायनामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भात विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर सरकारने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याची टीकाही त्यांनी केली. इटलीमध्ये बंद करण्यात आलेल्या कंपनीचे उत्पादन येथे सुरक्षित असल्याचे सांगणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितल्याचे त्यांनी सांगितले. लोटे एमआयडीसीतील घटनांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये स्थानिक नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते व तज्ज्ञांचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या समितीत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश नसावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकण परिसरात प्रदूषण वाढवून पर्यावरण व जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी. अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या तसेच ‘झिरो डिस्चार्ज’चे नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही समितीने केली आहे. स्थानिक नागरिकांना एकत्र करून या प्रश्नांवर लढा सुरू ठेवणार असल्याचे दलवाई यांनी सांगितले.




