बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवू नये यासाठी खबरदारी आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे


रत्नागिरी, दि. 7 ):- बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. जन्मजात बालकांमध्ये श्रवणदोष अनुवंशिक रित्या निर्माण होऊ नये याकरिता मूकबधिर दाम्पत्यांनी मूल जन्माला घालण्यापूर्वी जेनेटिक कौन्सिलिंग करणे आवश्यक आहे. तसेच जन्मजात दोषाचे वेळीच निदान होण्याकरिता जिल्ह्यातून सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये नवजात बालकांचे श्रवणदोष चाचणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक शिशु ची चाचणी होणे आवश्यक आहे. याकरिता अंगणवाडी सेविका, आशा तसेच माता-पितांनी देखील सजग राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन, केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक श्रवण दिन स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन जिल्हा परिषद येथे साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने श्रीमती रानडे यांनी संदेशातून आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते जिल्हा परिषद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय येथील कान घसा तज्ञ डॉ. वैभवी व्यास व वाचा उपचार तज्ज्ञ अभिषेक गांधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे, विशेष शिक्षिका श्रीम. मयेकर, मुख्याध्यापक गजानन राजपूत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या व्यवस्थापक आरती कदम आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातून शाळेकडे प्रत्येक मुलासाठी श्रवण आरोग्य या जागतिक थीम बाबत प्रस्तावनेत श्रीमती शिरभाते यांनी माहिती दिली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या व्यवस्थापक श्रीमती कदम यांनी श्रवणदोष असलेल्या बालकांसाठी उपलब्ध असलेल्या संदर्भ सेवा योजनांचे मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे जन्मजात बालकांच्या श्रवणदोष तपासणीची सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले.
श्रवणदोष प्रतिबंधाबद्दल डॉ. कश्मीरा चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर लवकर निदान होवून लवकर उपचार याबाबत वाचा उपचार तज्ञ प्राजक्ता भोगटे, सातवसे यांनी सविस्तर विवेचन केले.
यावेळी दिव्यांग सक्षमीकरण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्रवण बाधित दिव्यांगांच्या समस्या, विविध योजना व पुनर्वसन याबाबत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक केंद्राच्या श्रीमती पाथरे यांनी उपस्थितांशी चर्चा केली.
या प्रसंगी कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर मुख्य प्रवाहात आलेल्या आर्या सुशांत रेवाळे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण केले. कै. के. पी. अभ्यंकर मूकबधिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
श्रवणदोष असलेल्या बालकांची व प्रौढ व्यक्तींची आस्था फिरते श्रवणदोष चाचणी केंद्रात तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे साईंन लँग्वेज इंटरप्रीटर म्हणून सीमा मुळे यांनी काम पाहिले, सूत्रसंचालन राजेश गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कक्षातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संजय बलाढ्ये यांनी केले. कार्यक्रमाला दिव्यांग, पालक, विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button