
रत्नागिरी हापूसचे महत्त्व कमी होवू देणार नाहीआंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन**– पालकमंत्री डॉ. उदय सामंत
*रत्नागिरी, :- गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 80 टक्के कमी आंबा उत्पादन होत असल्याने याबाबतीतील कारणांसह तालुकानिहाय वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल शासनाकडे पाठवा. आंबा बागायतदारांसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेवून प्रयत्न करु, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा आंबा बागायतदार यांच्या अडीअडचणी संदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आज बैठक घेतली. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी आदींसह आंबा बागायतदार उपस्थित होते.
कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या संयुक्त अहवालात प्रदीर्घ दव व थंडीमुळे मोहोर काळा पडला, नर मोहोरांचे प्रमाण वाढले, तुडतुडा, फुलकिडीमुळे गतवर्षी पेक्षा चालू वर्षी 80 टक्के आंबा उत्पादन कमी झाल्याचे श्री. सदाफुले यांनी सांगितले.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, पणनमंत्री जयकुमार रावल तसेच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत बैठक लावू. या बैठकीत जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावू. त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. स्वयंचलित हवामान केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये बसविले जातील. असे केंद्र बसवणारा राज्यातील रत्नागिरी पहिला जिल्हा असेल.
*विद्यापीठाने संशोधन करावे*
आंब्यावर प्रादुर्भाव होणार नाही त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करावे. काजू, कोकम, फणस यावर देखील संशोधन झाले पाहिजे. त्याचबरोबर फवारणी आधी एक महिना विद्यापीठाने वेळापत्रक दिले पाहिजे.
रत्नागिरी हापूसचे महत्त्व कमी होवू देणार नाही
रत्नागिरी हापूसचे महत्त्व अजिबात कमी होवू देणार नाही त्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली जाईल. त्यांच्याशी चर्चा करुन रत्नागिरी हापूस बाबत समस्या सोडवू. जे मांडायचे आहे तेही मांडू. ‘रत्नागिरी हापूस’ आपली चव आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
सीएमइजीपी उद्दिष्ट पूर्ण न केल्यास…
बँका या शेतकऱ्यांसाठी आहेत. सिबील स्कोर न पाहता त्यांनी कर्ज दिलेच पाहिजे. शेतकऱ्यांची मुले व्यावसायिक, उद्योजक करण्यासाठी बँकांनी सीएमइजीपी चे दिलेली उद्दिष्टं पूर्ण करावीत. ज्या बँका विनाकारण शेतकऱ्यांना सिबील स्कोअरवरुन त्रास देत असतील, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. ज्या बँका सीएमइजीपीची उद्दिष्टे पूर्ण करणार नाहीत, त्या बँकांमधील शासकीय खाती काढून घेतली जातील, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यातील जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभाग, भू संपादन तसेच मंजूर व नियोजित कामांच्या सद्यस्थितीबाबतही आज आढावा घेण्यात आला. अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर, विवेक सोनार आदींनी यावेळी माहिती दिली.




