रत्नागिरी पोलिसांचा विश्वासू, धाडसी साथीदार विराट या पोलीस श्वानाचे गुरुवारी आकस्मिक निधन


  रत्नागिरी पोलिसांचा विश्वासू, धाडसी साथीदार विराट या पोलीस श्वानाचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. एका कर्तबगार सहकाऱ्याच्या अशा आकस्मिक जाण्याने संपूर्ण रत्नागिरी पोलीस दलावर शोककळा पसरली असून, त्याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉबरमन जातीचा असलेला विराट २०१७ साली रत्नागिरीच्या पोलीस दलात दाखल झाला होता. गेल्या ९ वर्षांच्या त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना महत्त्वाची साथ दिली होती, यामध्ये प्रामुख्याने २ खुनाचे गुन्हे, १ अपहरणाचा गुन्हा आणि १० चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
गुन्हेगारापर्यंत पोहोचताना विराटची चपळाई आणि कुशाग्रपणा, वासावरून गुन्ह्याची क्लू पोलिसांना मिळवून देण्यात त्याचा हातखंडा होता, ज्यामुळे पोलीस तपासाला मोठी गती मिळत असे.
अशा विश्वासू साथीदाराचा आज आकस्मिक मृत्यू झाला आणि पोलीस दलावर शोककळा पसरली आपला एक सच्चा साथीदार गमावल्याची भावना सर्वांमध्ये होती. या लाडक्या साथीदाराला पोलिसांच्या बॉम्ब शोध नाश पथकाच्या कार्यालयाच्या आवारात शेवटचा निरोप सुद्धा साश्रू नयनांनी आणि शासकीय इतमामाने देण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, पोलीस उपनिरीक्षक शेगाबेन मावची पोलीस उपनिरीक्षक किरण घाग  आणि इतर पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button