
सुरेश भातडे याची ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत रौप्य पदकावर मोहोर
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार!
रत्नागिरी:
सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र श्री २०२६’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीच्या सुरेश सत्यवान भातडे याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ६५ किलो वजनी गटात त्याने रौप्य पदक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तरुण भारत मंडळ, सांगली यांच्या वतीने २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कसलेल्या शरीरसौष्ठवपटूंना मागे टाकत सुरेशने आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली.
या उल्लेखनीय यशामुळे सुरेश भातडे याची निवड राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाली आहे. येत्या २८ आणि २९ मार्च रोजी मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सुरेश फिनिक्स जीम, जयस्तंभ रत्नागिरी येथे व्यायाम करतो. सुरेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




