
खेडजवळ मांडवी एक्सप्रेसमधून उडी; महिलेचा मृत्यू, बालकासह दोघे गंभीर
मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, दीड वर्षांच्या बालकासह एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मृत महिलेचे नाव शुभ्रा अतिश दिवेकर असे असून, सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचे दीड वर्षांचे मूल गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून हे तिघे प्रवास करत होते. सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ त्यांनी अचानक धावत्या रेल्वेतून उडी मारली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांनाही कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले.
सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास खेड पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार विविध शक्यता तपासल्या जात असून, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील कारण स्पष्ट होणार




