
राजापूर तालुक्यातील हातदे गावातील पालखी वादावर पडदा; तहसीलदारांचा शिमगोत्सव एकत्र साजरा करण्याचा आदेश
राजापूर तालुक्यातील हातदे गावात शिमगोत्सवातील ग्रामदैवताच्या पालखीवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. राजापूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विकास गंबरे यांनी ग्रामदैवत रामेश्वर रवळनाथ देवाचा शिमगोत्सव एकत्रित साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्रामदैवताची पालखी चर्मकार समाजाच्या घरी नेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
हातदे गावातील रामेश्वर रवळनाथ देवाच्या शिमगोत्सवात मानपान आणि पालखी नेण्यावरून वाद निर्माण झाला होता. याबाबत चर्मकार समाजाच्यावतीने रामदास तुकाराम धामापूरकर यांनी तक्रार केली होती. तर भावेश धामापूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी रामदास तुकाराम धामापूरकर यांनी सुशिल हरिश्चंद्र चव्हाण व इतरांविरोधात केलेल्या तक्रार अर्जावर राजापूर तहसीलदार कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे तसेच पोलीस प्रशासनाचा अहवाल ऐकल्यानंतर तहसीलदार विकास गंबरे यांनी निर्णय दिला.
निर्णयानुसार, शिमगोत्सवातील ग्रामदेवतेची पालखी तक्रारदारांच्या घरी नेण्यात यावी तसेच दोन्ही पक्षांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिमगोत्सव साजरा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हातदे गावात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.




