
तोट्यात असलेल्या चिपळूण नगरपालिकेला आता सौर उर्जा प्रकल्पापून उत्पन्न मिळणार
चिपळूण नगर परिषदेचे काही विभाग तोट्यात असल्याने त्यांना उभारी देण्यासह नगर परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी कामथे येथील १४ एकर जागेत सौरऊर्जा प्रकल्प साकारला जाणार आहे. यातून महिन्याला ९ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून यातील २ मेगावॅट वीज नगर परिषदेला लागणार आहे. शिल्लक ७ मेगावॅट वीज महावितरणला विकली जाणार असून यातून १० लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच वीज बिलापोटी होणारा अडीच कोटीचा खर्चही वाचणार आहे. याचबरोबर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावर साकारलेला सौरऊर्जा प्रकल्पही अत्याधुनिक केला जाणार आहे.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत गुरुवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली.
या सभेत अनेक विषयांवर चर्चा करताना प्रामुख्याने तोट्यात असलेली पाणी योजना, ठेकेदारी पद्धतीवर घेतल्या जाणार्या कर्मचार्यांच्या पगारावर होणारा मोठा खर्च, वाहने दुरुस्ती, इंधन याच्या खर्चात होणारी वाढ, वीज बिलावर होणारा मोठा खर्च याचा विचार करता नगर परिषदेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे असल्याचे मत अनेक नगरसेवकांनी मांडले. मात्र उत्पन्न वाढवताना नागरिकांच्या असलेल्या सुविधा कमी न करता, त्यांच्यावर करवाढीचा बोजा न टाकता वाढवावे असे मत अनेकांनी मांडले. यामुळे उत्पन्न नेमके कसे वाढवावाने या कोंडीत सापडलेल्या प्रशासनाला उत्तर देता आले नाही. त्यामुळे अखेर नगराध्यक्ष सकपाळ यांनी उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत याची माहिती सभागृहाना दिली.www.konkantoday.com




