
राजापूर जवळ हातीवले येथे दीड कोटींचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई केली आहे. राजापूर तालुक्यातील हातीवले येथील प्रस्तावित टोलनाक्याजवळ एका सहाचाकी कंटेनरमधून बेकायदेशीररीत्या वाहतूक केला जाणारा सुमारे १ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका टाटा कंपनीच्या कंटेनरची (रजि. नं. एम एल ०१ एडी ०१२१) झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आणि फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडचे एकूण १३०० कागदी पुठ्ठयाचे बॉक्स (११,२३२ ब.लि.) आढळून आले. जप्त केलेल्या केवळ मद्याची किंमत १ कोटी ३७ लाख २८ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी वाहनचालक आरोपी गणेश कुमार पोकरराम (रा. बारमेर, राजस्थान) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक गणेश जाधव आणि जवान वैभव सोनावले, मलिक धोत्रे, मानस पवार, विशाल भोसले, निलेश तुपे व सागर टिकार यांचा समावेश होता.




