‘एमपीएससी’चा निकाल जाहीर! प्रवर्गनिहाय कट-ऑफ घोषित; पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध!


महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदा कट-ऑफ विक्रमी लागल्याने परीक्षेतील स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे. यावेळी हा निकाल जाहीर करण्यासाठी आयोगाने बराच वेळ घेतला आहे. तब्बल साडे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेले उमेदवार आता पुढील तयारीला लागू शकतात. निकालात पूर्व परीक्षेतील बैठक क्रमांकासह नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ (राज्य सेवा गट-अ व गट-ब) चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आला. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी आणि गुणांची सीमारेषा (कट-ऑफ) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या निकालात प्रवर्गनिहाय कट-ऑफ पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. सामान्य प्रवर्गासाठी पुरुषांचा कट-ऑफ ११६ गुण, तर महिलांचा १११ गुण आहे. एससी प्रवर्गात पुरुषांचा कट-ऑफ १०९ गुण आणि महिलांचा १०४ गुण आहे. एसटी प्रवर्गात पुरुषांसाठी ९९ गुण, तर महिलांसाठी ९४ गुण कट-ऑफ निश्चित करण्यात आला आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात पुरुषांचा कट-ऑफ ११६ गुण असून महिलांचा १११ गुण आहे. ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गात पुरुषांचा कट-ऑफ १०३ गुण, तर महिलांचा ९९.५० गुण आहे. तसेच एसईबीसी प्रवर्गात पुरुषांसाठी ११६ गुण आणि महिलांसाठी १११ गुण असा कट-ऑफ जाहीर करण्यात आला आहे.

पात्र उमेदवारांना ‘एसएमएस’

पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार, त्यांच्या पात्रतेची पडताळणी होण्याच्या अटीवर, पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकीच विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या आणि परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश दिला जाईल. मुख्य परीक्षेसंदर्भातील अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येईल. तसेच, मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघुसंदेश (एसएमएस) द्वारे माहिती कळविण्यात येत आहे.

मागील आठवड्यात २० फेब्रुवारी रोजी या परीक्षेसाठी शद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यानुासर ही जाहिरातीत पदांचा सुधारित तपशील जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यसेवा परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गापैकी ११ पदे वगळून एकूण १३९ पदांचा सुधारित तपशील प्रसिद्ध करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button