
विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर न.प.च्या तीन वादग्रस्त कामाना स्थगिती?
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या वादग्रस्त कामांना पुढील सभेत स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिवसेनेच्या पक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती निर्माण झाल्याने सत्ताधार्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
३० जानेवारी रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या सभेमध्ये काही विकासकामाच्या मंजुरीचे ठराव मांडण्यात आले होते. मात्र, यामध्ये धक्कादायक बाब अशी होती की जी कामे प्रशासकीय राजवटीत आधीच पूर्ण झाली आहेत त्यांच्या मंजुरीसाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये प्रभाग १४ मधील शाळा क्र. ३ समोरील व्यायामशाळेचे ३० लाखांचे बांधकाम (जे आधीच पूर्ण झाले आहे), अरुण आईस्क्रीम शेजारील रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे आणि आठवडा बाजार येथील सार्वजनिक शौचालय परिसराचे सुशोभिकरण ही कामे आहेत. याबाबत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत जिल्हाधिकार्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती. आधीच पूर्ण झालेल्या कामांना नव्या पदाधिकार्यांनी मंजुरी देणे हे प्रशासकीय नियमांचे उल्लंघन असून यात गैरव्यवहाराची शक्यता कीर यांनी वर्तवली होती. ही बाब चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
www.konkantoday.com




