रत्नागिरी आणि कोल्हापूर महामार्गाच्या ठेकेदारांवर केंद्र सरकारकडून कारवाई


रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्ग १६६ (एनएच-१६६) च्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कंत्राटदारांवर कडक कारवाई केली आहे. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे ठेवल्याबद्दल आणि रस्ता वाहतुकीयोग्य न राखल्याबद्दल तीन टप्प्यांतील कामांसाठी एकूण ९ कोटी ८६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय एका कंत्राटदाराला कामातील हलगर्जीपणामुळे पुढील आठ महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील खड्डे, अर्धवट कामे आणि रखडलेली दुरुस्ती यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.
वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. महामार्गाच्या कामाचे तीन पॅकेजमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्ही भागांतील कंत्राटदारांनी रस्त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रस्ते वाहतूक मंत्रालयाने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. रस्ता सुस्थितीत ठेवणे ही कंत्राटदारांची जबाबदारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ९.८६ कोटी रुपयांचा दंड संबंधित कंत्राटदारांच्या देयकातून वसूल केला जाणार आहे. तसेच काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला पुढील आठ महिन्यांत कोणत्याही नवीन शासकीय कामात सहभागी होता येणार नाही. केंद्राच्या या कारवाईमुळे दर्जाहीन काम करणार्‍या कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली असून, आता तरी महामार्गाचे काम वेगाने आणि गुणवत्तेने पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button