
शंभू स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून कुडली नं. ३ शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वितरण
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं. ३ मधील शिक्षकांनी व ग्रामस्थांनी गुणवत्ता वाढीसाठी आनंददायी शैक्षणिक परिसर निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये सुमारे १६ लाख रुपयांचा फार मोठा शैक्षणिक उठाव करून शाळेचा कायापालट केला आहे. समाज माध्यमाच्या माध्यमातून या शाळेची होणारी प्रसिद्धी पाहून शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांचे मित्र आणि शंभू स्पोर्ट्स मनोरचे (पालघर) मालक संतोष सुकाळे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असणारा स्पोर्ट ड्रेस भेट म्हणून दिलेला आहे.
शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी होत असणारा प्रयत्न आणि सुसज्ज सुंदर असा परिसर करण्यासाठी पालकांनी केलेली मेहनत पाहून आपलाही हातभार या शाळेला लागावा, अशी इच्छा श्री. सुकाळे यांनी व्यक्त केली आणि या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा स्पोर्ट ड्रेस असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वितरण केले.
यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश वनये, उपाध्यक्षा सौ. संजीवनी थोरसे, माजी उपसरपंच श्री. गुरव, शांताराम थोरसे, मुख्याध्यापक श्री. सावंत, उपशिक्षक महेश खारतोडे, पदवीधर शिक्षक गणेश पाडवी व विद्यार्थ्यांनी देणगीदारांचे आभार व्यक्त केले.




