
दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, रायपाटणमध्ये अतिरिक्त तहसीलदार कार्यालय मंजूर
उत्तर व दक्षिण रत्नागिरीतील नागरिकांना मोठा दिलासा
रत्नागिरी —राज्य सरकारने प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत दापोली येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच रायपाटण येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली ही मागणी अखेर मान्य झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने दापोली, मंडणगड आणि खेड यांसारख्या उत्तर भागातील तालुक्यांतील नागरिकांना जिल्हा मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरात येण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत होता.
महसुली अपीलांच्या सुनावण्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या तसेच विविध प्रशासकीय कामांसाठी नागरिकांचा संपूर्ण दिवस प्रवासात खर्च होत असे.
आता दापोली येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर उत्तर रत्नागिरीतील तालुक्यांसाठी दापोली हेच प्रमुख प्रशासकीय केंद्र ठरणार आहे.
या कार्यालयामुळे सातबारा उताऱ्यातील फेरफार, जमिनीचे गुंतागुंतीचे वाद, पुनर्वसनाचे प्रश्न तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर अधिक जलद आणि प्रभावीपणे होणार आहे. त्यामुळे नागरिकांची वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे.
दरम्यान, राजापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून रायपाटण आणि आसपासचा परिसर तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून दूर आहे. या भागातील नागरिकांना महसुली कामांसाठी, विविध दाखल्यांसाठी तसेच जमिनीच्या वादांबाबत राजापूर शहरात जावे लागत होते.
आता रायपाटण येथे अतिरिक्त तहसीलदार कार्यालय मंजूर झाल्यामुळे सुमारे ५० ते ६० गावांतील नागरिकांना थेट दिलासा मिळणार आहे.
स्थानिक पातळीवर अतिरिक्त तहसीलदार दर्जाचे अधिकारी उपलब्ध झाल्याने प्रशासकीय कामांना गती मिळेल.
विशेषतः पावसाळा किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात या दुर्गम भागात शासकीय मदत, नियंत्रण आणि समन्वय अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याने हा निर्णय नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.




