
वादळी वाऱ्यांसह पावसाचा कमबॅक होणार
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. जुलैच्या सुरुवातीला धो-धो बरसल्यानंतर पुन्हा शांतता होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात तापमान पुन्हा वाढू लागलं होतं.पण आता नागरिकांना पुन्हा दिलासा मिळणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ जुलैपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा ‘कमबॅक’ होणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता कमी होती. २० जुलैपासून मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात होईल असा अंदाज आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये १५ जुलै रोजी वातावरण कोरडचं राहील किंवा हलक्या सरींची शक्यता आहे. पण कोकण विभागाच्या दिशेने ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाचं पुनार्गमन होणार आहे.हवामान विभागाने १५ जुलै रोजी पहाटे चार वाजता जारी केलेल्या अलर्टनुसार, आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी या परिसरांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्यांतच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणात आज हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज आहे. जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. सातारा आणि कोल्हापुरात घाट परिसरात वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही दिवसभर हलक्या पावसाची शक्यता आहे घाट परिसरात वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होऊ शकतो. १७ जुलैनंतर पुण्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.




