
कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक जाहीर! मांडवी, तेजससह अनेक गाड्यांच्या वेळा बदलणार
कोकणवासीयांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळी हंगामात रेल्वेचे नवे वेळापत्रक जारी केले जाते. तसेच यंदाही कोकण रेल्वे प्रशासनाने मान्सून वेळापत्रक लागू करण्याची घोषणा केली आहे.परिणामी अनेक गाड्यांच्या वेळा बदलणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळणे, रुळांवर पाणी साचणे, झाडे पडणे तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन मान्सून वेळापत्रक जारी केले जाते. त्यामुळे यंदा हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण रेल्वे प्रशासनाने १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी मान्सून वेळापत्रक लागू करण्याची घोषणा केली आहे.
यामध्ये अनेक कोकण रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल केले जाणार आहेत. तसेच रेल्वे गाड्यांची वेगमर्यादा देखील लागू केली जाणार आहे. तथापि कोकण रेल्वे प्रशासनाच्या मान्सून वेळापत्रकात कोकणकन्या एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस , मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत.
दरम्यान, मान्सून वेळापत्रकाची घोषणा स्थानकांवरील सूचना फलक, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली तसेच प्रसारमाध्यमांद्वारे प्रवाशांना दिली जाणार आहे. त्यामुळे पावसाळी हंगामात प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी गाडीचे नवे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.




