
कशेडी घाटात आज सकाळी दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात आज बुधवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून, कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू केली आहे. मात्र, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.




