
शब्दाला जागणारे नेतृत्व; स्व. अजित पवारांचा दिलेला शब्द सुनेत्राताई पवार यांनी जपला. आमदार निकम यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थिती
राजकारणात शब्दाला जागणारे नेतृत्व अशी ओळख असलेल्या स्व. अजित पवार यांनी दिलेला शेवटचा शब्द त्यांच्या निधनानंतरही खाली पडू दिला गेला नाही, याचा प्रत्यय चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पुन्हा एकदा आला. आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः उपस्थित राहून पवार व निकम कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आज (शुक्रवारी) आमदार शेखर निकम यांच्या कन्या मुक्ता आणि ओवळी येथील रवींद्र शिंदे यांचे ज्येष्ठ सुपुत्र अक्षय यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहाला उपस्थित राहण्याचा शब्द स्व. अजित पवार यांनी आमदार शेखर निकम यांना दिला होता. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे हा शब्द अपुरा राहतो की काय, अशी भावना अनेकांच्या मनात होती. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः उपस्थित राहून तो शब्द पूर्ण केला.
विशेष म्हणजे, स्व. अजित पवार यांनी सुचवलेलाच मुहूर्त या विवाहासाठी निश्चित करण्यात आला होता. शासकीय आणि राजकीय व्यस्तता असूनही त्यांनी दिलेल्या शब्दाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले. त्यांच्या पश्चातही पवार कुटुंबाने तो शब्द जपल्याने सर्वत्र कौतुकाची चर्चा सुरू आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमुळे या विवाह सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या तसेच निकम व शिंदे कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला. या उपस्थितीने पवार आणि निकम कुटुंबातील जुने, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा एकदा समोर आले.




