
दहावी परीक्षेसाठी कोकण मंडळातील २५ हून अधिक विद्यार्थी होणार प्रविष्ठ
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा उद्यापासून (२० फेब्रुवारी) सुरू होत आहे. कोकण विभागीय मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील एकूण २५,७७७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी एसटी बसेसचे नियोजन आणि केंद्रांवर अखंडित वीज पुरवठा ठेवण्याबाबत संबंधित विभागांना कळवण्यात आले आहे.
ही परीक्षा सकाळच्या सत्रात १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्रात २.३० वाजता होणार आहे. त्यामुळे वेळेत विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्व परीक्षार्थ्यांना परिक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर पोचण्याच्या सूचना शाळांमार्फत देण्यात आल्या आहेत. गतवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आली आहे.
कोकण बोर्डाया अख्यत्यारित रत्नागिरीत एकूण ४१३ शाळांसाठी ७३ केंद्र आणि सिंधुदुर्गमध्ये २२८ शाळांसाठी एकूण ४१ केंद्रे अशी मिळून या दोन्ही जिल्ह्यात एकूण ११४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यात एकूण २२ परिरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १७ हजार ४५० विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ हजार ३२७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
चालू वर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समित्या अधिक सक्रियपणे काम करत आहेत. सीसीटिव्हीमुळे गैरप्रकारांना पूर्णत प्रतिबंध घालण्यात आला आहे. गैरप्रकार करणारे, त्यांना मदत करणारे आणि उत्तेजन देणारे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हे नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबवताना परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद राहतील आणि कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विभागीय मंडळाने विशेष भरारी पथके नेमली आहेत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रांना भेटी देणार आहेत. ज्या ४ केंद्रांवर सीसीटीव्ही नाहीत, तिथे बाहेरील शाळांतील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष समुपदेशन व हेल्पलाईन ; परीक्षेचा ताण घालवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली असून 02352-231250 आणि 02352-228480 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. उत्तरपत्रिकांचे अचूक लेखन कसे करावे, यासाठी विषयतज्ञांचे व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाच्या चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणत्याही अफवांना किंवा चुकीच्या वेळापत्रकाला बळी पडू नका. मंडळाने अधिकृतरीत्या प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.




