सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत नवी राजकीय समीकरणे; ६ अपक्ष आणि ठाकरे गटाची ‘विकास आघाडी’ स्थापन!


सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीवर वचक ठेवण्यासाठी ६ अपक्ष आणि ठाकरे शिवसेनेच्या ३ सदस्यांनी एकत्र येत ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी’ नावाचा नवा गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी इन्सुली मतदारसंघातील अपक्ष सदस्य नितीन राऊळ यांची निवड करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे २७ आणि शिवसेनेचे १४ असे एकूण ४१ सदस्य निवडून आले आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपच्या ६ बंडखोर उमेदवारांनी अपक्ष लढून विजय मिळवला होता. भाजपने या सहाही जणांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. हे विजयी उमेदवार पुन्हा भाजपमध्ये जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, मात्र त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या ३ सदस्यांशी हातमिळवणी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपक्ष गटात नितीन राऊळ (इन्सुली), राजन चिके (फोंडाघाट), रुपेश पावसकर (नेरूर देऊळवाडा), शिवानी नाईक (माडखोल), मायकल डिसोझा (कोलगाव) आणि सुजाता पडवळ (तुळस).ठाकरे शिवसेना: गंगाराम सडवेलकर (पिंगुळी), संजय गावडे (उभादांडा) आणि विजय नाईक (तुळस) यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी, या ९ सदस्यांच्या नव्या आघाडीमुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव राहणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर या गटाची स्थापना झाल्याने आगामी काळात जिल्हा परिषदेच्या कामकाजात ही आघाडी महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये परतण्याऐवजी ‘स्वतंत्र अस्तित्वाचा’ मार्ग निवडल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे.
भाजप आणि शिंदे शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या ठिकाणी भाजपकडे जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्षपद शिंदे शिवसेनेकडे जाईल अशी चर्चा आहे. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या समर्थकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे अपक्षांच्या स्वतंत्र गटाला महत्त्व प्राप्त झाले असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button