
महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका पुन्हा घ्यायला हव्यात- उद्धव ठाकरे
पक्ष चोरण्याची आणि लोकशाहीची हत्या करण्याची निवडणूक आयोगाची पद्धती झाली होती. परंतु देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा विद्रूप चेहरा आज देशासमोर आला आहे. याच ज्ञानेश कुमार यांनी शिवसेनेवर पहिला आघात केला, त्यानंतर राष्ट्रवादी आणि आता ममता बॅनर्जी यांनाही त्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले.निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची मनमानी देशासमोर आल्याने त्यांना तातडीने तुरूंगात टाकावे, अशी आक्रमक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.
निवडणूक आयोगात फूट पडली असून मुख्य आयुक्तांच्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या दोन्ही सदस्यांनी आक्षेप नोंदवत त्यांची तक्रार कॅबिनेट सचिवांकडे केल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले. या वृत्तानंतर देशभरात खळबळ माजली आहे. काही निर्णयांना आमचा विरोध असूनही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार थेटपणे निर्णय घेत असल्याची तक्रार सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली.आम्ही विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि विचित्र कारभारावर बोलतोय. दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात तक्रार केली. निवडणूक आयोग मनमानीपणे कारभार करतोय, हे समोर आले. एक टोळीप्रमाणे निवडणूक आयोग काम करतो आहे. ज्ञानेश कुमार यांना तत्काळ कोठडीत टाकायला पाहिजे. गृह खाते निवडणूक आयोग चालवत असल्याचे दिसते, मग त्या मागचा सूत्रधार कोण आहे, तेही समोर यायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.काही निकाल देताना निवडणूक आयुक्तांनी अभ्यास करायला पाहिजे होता. तो न करता आमचे चिन्ह गद्दारांना दिले. शरद पवार साहेबांच्या बाबतीत तेच घडवले. तृणमूल बाबतीत देखील तोच कित्ता गिरवला. निवडणूक आयोगाच्या गैर कारभाराबाबत आम्ही आवाज उठवत आहोत. सत्तेची हौस, आणि त्यातून लोकशाहीचा खून करणाऱ्या ज्ञानेश कुमार याची जागा तुरुंगातच आहे. त्याला अटक केली पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला पाहिजे. देशाचे डोळे उघडले पाहिजे. आज मी सगळ्या विरोधी पक्षांना निमंत्रण देत आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन आता लढले पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि ताकद दाखवा. आता जनतेही रस्त्यावर उतरले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले
ज्ञानेश कुमार पदावर बसलेले असताना निवडणुकांमध्ये गडबड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका पुन्हा घ्यायला हव्यात, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.




